महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता काही जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा
राज्यात पुन्हा ऑक्टोबर हिट चा चटका जाणवू लागला आहे. परंतु त्यातही मुंबईत शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी राज्यात हवामानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. धुळे,नाशिक,अहिल्यानगर, जिल्ह्यात वादळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट चा इशारा दिला आहे.
या आठवड्यात ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये तर नाशिक, पुणे शहर, कोल्हापूर, सातारा ,सोलापूर, सांगली ,पश्चिम घाट, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी व मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण विभागात पावसाची शक्यता आहे. देशातील हवामानाची परिस्थिती पाहता उत्तर लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांमुळे तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले असून हे वादळी चक्र किनाऱ्यापासून दूर जात आहे. तसेच उत्तर तामिळनाडू व आंध्रप्रदेशात चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य अंदमान समुद्रात चक्राकार वारे वाहत असून या परिसरावर सोमवार पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसासह गारपिटी होण्याचा इशारा दिला आहे.
