महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र सदनात भव्य गणेशोत्सव; राज्यपालांना अधिकृत निमंत्रण

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात आगामी १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि दिमाखदार सार्वजनिक गणेशोत्सवाचे औपचारिक निमंत्रण महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी सुपूर्द केले आहे. या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन गणेशोत्सवादरम्यान पार पडणाऱ्या विविध धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. डॉ. श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या या गणेशोत्सवामुळे राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि लोकपरंपरेचे अत्यंत आकर्षक दर्शन घडणार आहे.

         या महोत्सवाचा शुभारंभ १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या भव्य मिरवणुकीने होणार असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता विधिवत प्राण प्रतिष्ठापना केली जाईल. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी जुन्या महाराष्ट्र सदनात भक्तिमय भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण उत्सव काळात दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६:१५ वाजता श्रींची महाआरती पार पडेल, ज्यामध्ये भाविकांना सहभाग घेता येईल.

       या महोत्सवात महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी अनुभवता येणार असून, १५ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे भरत जाधव व इतर कलाकारांचा अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेला मराठी नाट्यप्रयोग ‘सही रे सही’ सादर होणार आहे. १७ सप्टेंबर रोजी ख्यातनाम कवी वैभव जोशी आणि संदीप खरे यांचा विशेष कार्यक्रम, तर १८ सप्टेंबर रोजी संतोष भांगरे प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लोककला’ हा बहारदार कार्यक्रम दिल्ली करांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे.

       उत्सवाच्या पुढील पर्वात १९ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच दिवशी सायंकाळी गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा सुरेल मराठी गझल कार्यक्रम रंगणार आहे. २० सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे, शरद दाते व अन्य नामवंत गायकांचा ‘मराठी चित्रपट गीते’ हा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

      याशिवाय पाककला स्पर्धा, भरतनाट्यम, महिलांसाठी विशेष आकर्षण असणारा ‘खेळ पैठणीचा’, लावणी तसेच हिंदी-मराठी गायन आणि नृत्याचे विविध कार्यक्रम या संपूर्ण महोत्सवाची रंगत वाढवणार आहेत. गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी पारंपरिक झांज पथकाच्या दिमाखदार गजरात आणि श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने होईल. जुन्या महाराष्ट्र सदनातून निघणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त उत्साहात सहभागी होणार आहेत.

       या गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य खुले असणार आहेतमात्र १५, १७, १८, २० आणि २३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पालकांना व नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दिल्लीतील वासीय नागरिक आणि गणेशभक्तांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्ती, परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा अनोखा संगम अनुभवावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!