महावितरण ट्रान्स फॉर्मरमधून तांब्याची चोरी; आंतरराज्य टोळी जेरबंद
पुणे: पुणे शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात महावितरणच्या रोहित्रामधून (ट्रान्सफॉर्मर) तांब्याच्या बहुमूल्य तारा चोरी करणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्यीय टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत उत्तर प्रदेशातील तीन सराईत चोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून एकूण आठ गुन्हे उघडकीस आणत तब्बल १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद साहेबजान मंगेरखान (वय ३०), आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२) आणि चंद्रसेन शिवरतन धारिया (वय २८, तिघेही मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी, सध्या रा. गोटेमाळ, सासवड, जि. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे शहर आणि लगतच्या वाघोली व लोणीकंद परिसरामध्ये महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा लांबवल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या वाढत्या चोऱ्यांमुळे वीज यंत्रणा कोलमडत असून शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या गुन्ह्यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना बातमीदारा मार्फत खबऱ्याकडून माहिती मिळाली की, हवेली तालुक्यातील वाडेगाव परिसरात ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी ही टोळी मालवाहू टेम्पोमधून येणार आहे.
मिळालेल्या या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या पथकाने वाडेगाव परिसरात सापळा रचून अत्यंत चलाखीने पाठलाग करत एका संशयित मालवाहू टेम्पोसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मागील पाच ते सहा महिन्यांत लोणीकंद परिसरातील वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस आणि हिंगणगाव या भागातून तब्बल आठ ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी त्यांना अटक करून त्यांच्या कडून चोरीच्या साहित्यासह १२ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही अत्यंत महत्त्वाची कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, तसेच पोलीस अंमलदार विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, भरत उर्किडे, अमोल ढोणे, विकास कदम, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, किरण पलांडे, नेहा तापकीर, बाळासाहेब तनपुरे, समाधान पाटील, भरत गुंडवाड, प्रतिक्षा पानसरे आणि सोनाली नरवडे यांच्या पथकाने पार पाडली. शहरात आणि ग्रामीण भागात या प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या इतर रॅकेटचाही पोलीस आता सखोल शोध घेत आहेत.
