महत्त्वाच्या बातम्या

महिलांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या – पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई

सातारा : महिलांच्या मानसिक त्रास, छेडछाड तसेच हुंड्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला पोलीस विभागाने तात्काळ प्रतिसाद द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. पोलीस विभागाच्या शिवतेज सभागृहात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई  म्हणाले, “महिला पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. महिलांच्या तक्रारी संवेदनशीलपणे हाताळाव्यात. जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने कास पुष्प पठार, ओझर्डे, सडावाघापूरी धबधब्याकडे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी पोलीस तैनात करावेत.”

      ते पुढे म्हणाले, “पोलीस विभागाला आवश्यक त्या सर्व गोष्टींसाठी पालकमंत्री म्हणून माझे संपूर्ण सहकार्य राहील. कायदा आणि सुव्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीने राखावी, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि पोलीस विभागाने आपली कामगिरी उंचावावी.”या बैठकीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षेसाठीच्या उपाययोजना, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तैनाती आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!