महिला प्रवाशाच्या विनयभंगप्रकरणी न्यायालयाचा कठोर निकाल; आरोपीला १ वर्षाची सक्तमजुरी
दौंड: दौंड रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासा दरम्यान महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला तब्बल १२ वर्षांनंतर कठोर शिक्षेचा सामना करावा लागला आहे. दौंड रेल्वे कोर्टाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. सुनील दहातोंडे यांनी २०१४ मध्ये दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्याचा निकाल देत आरोपी रौफ रब्बानी शेख (वय ४०, रा. श्यामनगर, उषाकिरण पेट्रोल पंपाच्या मागे, लातूर) यास दोषी ठरवले असून, त्याला एक वर्षाची सक्तमजुरी आणि ३ हजार रुपयांच्या द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. या महत्वपूर्ण निकालानंतर लोहमार्ग पोलिसांच्या तपासाला आणि न्यायालयाच्या कामकाजाला मोठे यश आले असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दिलासा दायक मानला जात आहे.
या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी पाहता, फिर्यादी महिला २६ ऑगस्ट २०१४ रोजी लातूर ते मुंबई असा रेल्वे प्रवास करत होती. दौंड रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतर साधारण १० ते १५ मिनिटांतच आरोपी रौफ रब्बानी शेख याने अंधाराचा गैरफायदा घेऊन चालत्या रेल्वेगाडीत फिर्यादीच्या लज्जा उत्पन्न होईल असे विकृत वर्तन केले होते. या प्रकारानंतर घाबरलेल्या मात्र धाडसी प्रवाशाने तात्काळ दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गांभीर्याने तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा नोंदवून कायदेशीर तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती.
या बहुचर्चित खटल्याची सुनावणी दौंड रेल्वे न्यायालयात सविस्तरपणे पार पडली. यादरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले भक्कम पुरावे, फिर्यादीची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने पूर्णपणे ग्राह्य धरले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुनील दहातोंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८ (२) अन्वये आरोपीला दोषी सिद्ध करत ही शिक्षा सुनावली. गुन्हा घडल्यापासून न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना लोहमार्ग पोलीस आणि सरकारी विधिज्ञ टीमने या प्रकरणात उत्कृष्ट समन्वय राखत खटला मजबूत केला होता.
हा खटला न्याय्य परिणामा पर्यंत नेण्यासाठी सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रिया शिंदे, प्रभारी अधिकारी हिमालय जोशी आणि कोर्ट अंमलदार मोहम्मद शेख यांनी फिर्यादी, साक्षीदार व तपासी अंमलदार यांना वेळोवेळी कायदेशीर मार्गदर्शन व योग्य ब्रिफिंग केले होते, ज्यामुळे न्यायालयात साक्ष अत्यंत प्रभावीपणे नोंदवली गेली. तसेच, पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय शंकेश्वरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे आणि पोलीस उपनिरीक्षक शरणार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भीमा हागवणे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास पूर्ण केला, तर कोर्ट अंमलदार म्हणून सपोफौ मोहम्मद शेख यांनी कायदेशीर कामकाज पाहिले. पोलीस यंत्रणेचा हा उत्तम समन्वय आणि मजबूत पुराव्यांमुळेच गुन्हेगाराला कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.
