महत्त्वाच्या बातम्या

महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य; ‘उमेद’ अभियानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’च्या (‘उमेद’) माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होत आहे. ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना आधुनिक शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून प्रभावी पावले उचलली जात आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, कृषी निविष्ठांची सुलभ उपलब्धता आणि विविध व्यावसायिक उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला एक नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

      ‘उमेद’ अभियानांतर्गत प्रामुख्याने ‘कृषी अवजार बँक’ आणि ‘कृषी निविष्ठा केंद्र’ हे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री स्वतः खरेदी करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही, अशा महिलांना भाडे तत्त्वावर आधुनिक यंत्रे उपलब्ध करून देणे हा अवजार बँकेचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यांत तब्बल ४०८ कृषी अवजार बँकांची उभारणी करण्यात आली आहे. याद्वारे सुमारे ४० हजार ८०० महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून, यामध्ये ट्रॅक्टरसह विविध कृषिपूरक अवजारांचा समावेश आहे. महिला स्वयं सहाय्यता समूह, ग्राम संघ आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून या अवजार बँकांचे व्यवस्थापन केले जात असल्याने या केवळ सेवा देणाऱ्या यंत्रणा न राहता समुदायाच्या मालकीच्या सक्षम कृषी सेवा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत.

       या यांत्रिकी करणामुळे महिला शेतकऱ्यांचा भांडवली खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. पेरणी, आंतर मशागत आणि कापणी यांसारखी महत्त्वाची शेतीची कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने वेळेवर पूर्ण होत असल्याने शेतीची कार्यक्षमता वाढली आहे. तसेच, अवजारे भाड्याने देण्याच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांना नियमित उत्पन्नाचा हक्काचा स्रोत मिळत असून, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. कृषी निविष्ठांच्या क्षेत्रातही महिलांनी मोठी मजल मारली असून, राज्यातील ५४ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे बियाणे व खत विक्रीचे परवाने उपलब्ध आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ५४ हजार महिला सभासदांना दर्जेदार निविष्ठा योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध करून दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांचा बाजार पेठेवरील अवलंबित्व आणि खर्च दोन्ही घटले आहेत.

      ‘उमेद’ अभियानाचा आवाका केवळ कृषी क्षेत्रापुरता मर्यादित न राहता महिलांच्या व्यावसायिक विस्तारापर्यंत पोहोचला आहे. आज ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून रेशन दुकाने, सिमेंट एजन्सी, वीट निर्मिती, केरोसीन एजन्सी आणि टाईल्स निर्मिती यांसारख्या पारंपरिक क्षेत्राबाहेरील व्यवसायांची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. राज्यातील ५८ महिला रेशन दुकाने चालवत असून, सिमेंट आणि वीट निर्मिती व्यवसायातही महिला मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. बचत आणि कर्जाच्या चौकटीतून बाहेर पडून ग्रामीण महिला आता खऱ्या अर्थाने उद्योजिका बनत आहेत. व्यवसाय व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी झालेली जोडणी यामुळे महिलांची निर्णय क्षमता वाढली असून, ‘उमेद’ अभियान ग्रामीण महाराष्ट्राच्या बदलत्या आणि सक्षम आर्थिक चित्राचा एक अत्यंत महत्त्वाचा कणा ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!