महत्त्वाच्या बातम्या

महिला सरसंघचालका वरून पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपला सवाल; सरकारवरही निशाणा

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी महिलांना सरसंघचालक पद देणार का, असा थेट आणि रोखठोक सवाल उपस्थित करत काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला कोंडीत पकडले आहे. राहुल गांधी यांनी महिलांना संधी देण्याच्या मुद्द्यावर भाजपच्या वतीने होत असलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना चव्हाण यांनी हा सवाल केला आहे. नाशिक येथे काँग्रेसच्या सुरू असलेल्या शिबिराच्या समारोपा नंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण, राज्यातील पेपरफुटी, रस्त्यांची दुरवस्था आणि विविध विकास प्रकल्पां मधील भ्रष्टाचारावरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

         भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करताना असा सवाल केला जात होता की, महिलांना संधी देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या बहिणीलाच का संधी दिली? या टीकेला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्ष महिला आरक्षणाच्या बाजूने असून २०२३ मध्ये जेव्हा घटना दुरुस्ती विधेयक आणले गेले, तेव्हा काँग्रेसने त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. महिला आरक्षणाचे खरे जनक काँग्रेस पक्षच आहे, असे सांगत त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आणि संघ कधी महिलेला सरसंघचालक पद देणार का, असा सवाल उपस्थित केला. या राजकीय प्रश्नामुळे वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

        नाशिकमधील काँग्रेसच्या दहा दिवसांच्या शिबिराच्या समारोप प्रसंगी राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेऊन विविध महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतला. या बैठकीत कुंभमेळा नियोजन, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकरी समस्या यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. नाशिकमध्ये येत असताना राहुल गांधींना खराब रस्त्यांमुळे खड्ड्यांतून प्रवास करावा लागला, यावरून त्यांनी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जावर तीव्र संताप व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या प्रकल्पाचा अद्याप कोणताही ठोस रिपोर्ट आलेला नाही, असे सांगत त्यांनी ४० टक्के कमिशन खोरीचा गंभीर आरोप केला. शक्तीपीठ मार्गात देखील कमिशन लाटण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

         यावेळी राज्यातील वाढत्या पेपरफुटीच्या प्रकरणांवरही चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रत्येक परीक्षांचा पेपर फुटतो आणि या प्रकारामागे भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार असतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. परीक्षांचे पेपर दोन-दोन कोटी रुपयांना विकले जात असून, यात कोणालाही शिक्षा होत नसल्याने तरुणांचे भविष्य अंधारात जात आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एका बाजूला महिला आरक्षणावरून पेटलेले राजकारण आणि दुसऱ्या बाजूला नाशिक मधील विकासकामांचे प्रश्न व पेपरफुटीच्या मुद्यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!