मांजरी येथे ओव्हरटेक करताना काँक्रीट मिक्सरच्या खाली चिरडून महिलेचा मृत्यू
मांजरी येथे ओव्हरटेक करताना काँक्रीट मिक्सरच्या खाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ओव्हरटेक करताना काँक्रीट मिक्सर वाहनाचा दुचाकीला धक्का लागून महिला रस्त्यावर पडली आणि मिक्सरच्या मागील चाकाच्या खाली चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चालका विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणु ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय ३८, रा. केशवनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे पती ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय ३९, रा. केशवनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पत्नीसह रविवारी (४ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास खरेदीसाठी निघाले होते. ते केशवनगर-मांजरी रस्त्यावरून दुचाकीवरून जात होते. फिर्यादी हे दुचाकी चालवित होते तर त्यांच्या पत्नी मागे बसल्या होत्या. काँक्रीट मिक्सर (एमएच १२ एक्सएम ८१४१) वाहनाने फिर्यादी यांच्या दुचाकीला उजवीकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने अपघात झाला.
फिर्यादी आपल्या दुचाकीसह डाव्या बाजूला पडले. तर त्यांची पत्नी डाव्या बाजूला पडली आणि काँक्रीट मिक्सरच्या मागील चाकाच्या खाली चिरडली गेली. ही घटना मांजरी येथील तुपे कॉर्नर खाऊ गल्ली समोरील रस्त्यावर घडली.घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेतून महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.
