माणुसकी दिसत नाही तर ती पदोपदी जाणवते :- डॉ सतीश फरांदे
जगणं हे खूप सोपं असतं. मात्र आपण ते अवघड करून ठेवतो. माणुसकी अशी पाहिजे, ज्यामध्ये घेण्यापेक्षा देणे जास्त महत्त्वाचे आहे. माणुसकी दिसत नाही तर ती पदोपदी जाणवते. त्यासाठी माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. तरच येणारी पिढी माणुसकी जपेल आणि टिकवेल, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे अधिव्याख्याता डॉ. सतीश फरांदे यांनी केले.
नेवेकरवाडी (ता. जावळी ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक नितीन मोहिते यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या विद्याव्रत निवासी शिबिरात ते बोलत होते. यावेळी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश तांबे, आदर्श शिक्षक संदीप किर्वे अतुल बोराटे,जावळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजर, पोलीस पाटील सुहास भोसले, धनंजय गोरे यांच्यासह नेवेकरवाडी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. सतीश फरांदे यांनी मुलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिवबा घरात समजून घेतले पाहिजेत. फक्त जयंती, पुण्यथिती करून उपयोग नाही. त्यासाठी संस्काराचे व्यासपीठ घरात तयार झाले पाहिजे. ते संस्कार आई, आजी,आजोबा यांच्याकडूनच मिळते. घरातील वातावरण चांगलं ठेवा. संस्कार एका दिवसात घडत नाहीत वेळ लागतो. नितीन मोहिते यांनी सुरू केलेले हे शिबिर ग्रामस्थांच्या सहकार्याने पुढे जाईल. माणसांच्या वागण्या बोलण्यातूनच माणुसकी बाहेर आली पाहिजे, शेतात जे पेरतो ते उगवतंच असं नाही. त्यासाठी जे उगवते तेच पेरलं पाहिजे. त्यामुळेच या शिबिरातून माणुसकीतून मुलांच्यात जे पेराल तेच उगवणार आहे. यावेळी गणेश तांबे, प्रशांत गुजर यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे हे पाचवे वर्ष असून यातून मुलांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने हे चालू केले असल्याचे नितीन मोहिते यांनी सांगितले. आभार नितीन मोहिते यांनी मानले.
गेली पाच वर्षे हे विद्यावृत निवासी शिबीर नेवेकरवाडी येथे सुरू असून यामुळे पाच दिवस सपूर्ण गावात एक सन असल्यासारखे वातावरण असून पालक वर्गाची असणारी उपस्थिती पाहता मुख्याध्यापक नितिन मोहिते यांच्या आदर्श कामाची पोहोच पावती आहे.
