माण तालुक्यात ‘काश्मिर’ चा अनुभव
नेहमीच कडक उन्हाचे चटके सोसणाऱ्या माण तालुक्याला मात्र यंदाच्या सततच्या वळीव पावसाने झोडपल्यामुळे डोंगराळ भागात छोटे धबधबे व गर्द धुक्याची शाल पांघरल्यामुळे माण तालुक्यातील लोकांना सध्या काश्मीर अनुभवायला मिळत आहे. संपूर्ण माण तालुक्यात सलग पाच दिवसापासून पावसाचे धुमशान सुरूच आहे. आतापर्यंत माण तालुक्यामध्ये एकूण ११. ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. माण तालुक्याच्या पश्चिम भागातील , बिदाल, मलवडी, शिरवली, परकंदी, महिमानगड, पिंगळी, दहिवडी,आंधळी, बिजवडी, कासारवाडी या गावासह माणच्या पूर्व भागातही पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे.सर्वच भागात पावसाने संततदार सुरू होती. या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले ओसंडून वाहत होते.
गेले चार दिवस पावसाची संततदार सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्या पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. टोमॅटो आंबा सारख्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसानही पाहायला मिळत आहे. भुईमूग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे कडवळ सारखी चारा पिके भुइसपाट झाली आहेत.
निसर्गापुढे माणूस हतबल
शिंदीखुर्द येथील (दहिवडी-कुळकजाई रस्ता) या रस्त्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी पूल केला होता. मात्र सततच्या पावसामुळे तो भरावही खचून गेला होता. त्यामुळे संपूर्ण दिवस वाहतूक बंद होती. तो खचलेला रस्ता पुन्हा मोठ्या कष्टाने पूर्ववत करण्यात आला. मात्र आजच्या पावसाने तो भराव आणखी एकदा खचला व वाहतूक बंद झाली. यामुळे निसर्गापुढे माणूस हतबल असल्याची प्रचिती आली.
ग्रामीण भागातील एस.टी.च्या फेऱ्या रद्द
सततच्या पावसामुळे माणगंगा नदीवरील सर्वच बंधारे ओसंडून वहायला सुरवात झाली आहे.यामुळे बऱ्याच ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवरील पुलावरून पाणी वहायला सुरवात झाली आहे.ग्रामीण भागाला दहिवडी शहराला जोडणाऱ्या अनेक रस्त्यावरील पुलांवरून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे राणंद, मार्डी, खुटबाव,सोकासन मलवडी, आंधळी,कुळकजाई या मार्गांवर जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
