महत्त्वाच्या बातम्या

माण तालुक्यात गणेशोत्सव-उमाजी नाईक जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन

दहिवडी: आगामी गणेशोत्सव आणि आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शांतता, सलोखा आणि शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून साजरी केली जावी, असे स्पष्ट आवाहन दहिवडी येथे प्रशासनाच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले. तहसीलदार योगिता ढोले-खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत पोलीस प्रशासन, महसूल आणि वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कडक सूचना दिल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

      उत्सवा दरम्यान अवाजवी आवाज करणारे डीजे किंवा डॉल्बी कोणत्याही परिस्थितीत वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे बैठकीत सक्त निर्देश देण्यात आले. गणेशोत्सव मंडळांनी नागरिकांकडून कोणत्याही स्वरूपात जबरदस्तीने वर्गणी वसूल करू नये, तसेच दारू पिऊन मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्या किंवा कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या असामाजिक घटकांवर थेट कायदेशीर बडगा उगारला जाईल. उत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक प्रमुख गणेश मंडप आणि मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांनी मार्गदर्शन करताना, शासनाने गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला असल्याने राज्य शासनाच्या अधिकृत नियमावली नुसारच सर्व सार्वजनिक कार्यक्रम पार पाडले जावेत, असे नमूद केले.

        महावितरणचे शाखा अभियंता मुलाणी यांनी मंडपांमधील विजेच्या सुरक्षे बाबत महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, मंडपातील सजावट आणि वायरिंगचे काम केवळ अधिकृत परवानाधारक ठेकेदारांकडूनच करून घ्यावे. शॉर्टसर्किट किंवा अन्य प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी वायरिंगला सरसकट अर्थिंग (Earthing) करणे बंधनकारक आहे. तसेच पर्यावरणपूरक उत्सवावर भर देताना पंचायत समितीचे अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) ऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक नियोजन करण्याचे आवाहन केले.

        बैठकीच्या समारोपा प्रसंगी तहसीलदार योगिता ढोले-खाडे यांनी सर्व नागरिकांनी व मंडळांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून माण तालुक्यात यंदाचा गणेशोत्सव एका ‘आदर्श गणेशोत्सव’ म्हणून पार पाडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या उच्चस्तरीय बैठकीस तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!