महत्त्वाच्या बातम्या

‘मी सरकारचा भाग नाही’; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने राजकीय खळबळ

पुणे: पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असतानाच, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेले एक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, “मी सरकारचा भाग नाहीये, मी आमदार आणि लोकप्रतिनिधी आहे,” असे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना दिले. या अप्रत्याशित विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

       यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, राज्य सरकार नेहमीच संवादासाठी आणि चर्चेसाठी तयार असते. संवादातूनच कोणत्याही समस्येवर योग्य तोडगा काढण्याचा मार्ग शोधता येतो. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आम्ही संवाद साधण्यास पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, जर सरकार संवाद साधण्यास तयार आहे, तर मग प्रकरणाचा तोडगा काढण्यात नेमकी अडचण कुठे येत आहे? त्यावर उत्तर देताना त्यांनी, “कुठे अडतंय हे मला माहीत नाही, कारण मी सरकारचा भाग नाही. मी संवादाच्या टेबलवर बसत नाही,” असे म्हणत स्वतःला थेट चर्चेच्या प्रक्रियेतून वेगळे ठेवल्याचे दिसून आले.

       पुण्यातील या उच्चस्तरीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रमुख मंत्री, खासदार, आमदार आणि राज्यभरातून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, बैठकीपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी संवाद साधताना, मराठा आरक्षणावर पक्ष आणि सरकार अत्यंत सकारात्मक भूमिका घेत असून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

         पुण्यातील प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर, आगामी रणनीती आखण्यासाठी मुंबईतही भाजपची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील ‘वसंत स्मृती‘ कार्यालयात ही बैठक पार पडणार असून, यामध्ये आगामी राजकीय आणि संघटनात्मक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या बैठका सुरू असतानाच सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील समन्वया बाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!