मुंबई उपमहापौरांची बंगला मिळवण्याची आशा धूसर; आयुक्त अश्विनी भिडेंच्या निर्णयाने खळबळ
मुंबई: मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी आणि पालिका प्रशासन यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा उघड्यावर आले आहेत. भायखळा येथील राणीच्या बागेतील अतिरिक्त पालिक आयुक्तांचा रिकामा बंगला स्वतःसाठी मिळवण्यासाठी उपमहापौर घाडी यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. मात्र, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी त्यांची ही मागणी थेट फेटाळून लावली आहे. आपल्या पत्राची आणि मागणीची साधी दखलही प्रशासनाकडून घेतली गेली नसल्याचा आरोप करत संजय घाडी यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा एकदा जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दहिसर पूर्वेला वास्तव्यास असल्याने दररोज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात ये-जा करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वेळेवर पोहोचणे शक्य होत नाही, असा दाखला देत घाडी यांनी २५ जून रोजी पालिका आयुक्तांना पत्र लिहून निवासाची सोय करण्याची विनंती केली होती. राणीच्या बागेत महापौरांच्या बंगल्यालगतच अतिरिक्त आयुक्तांचे सेवानिवासस्थान असल्याने हा बंगला आपल्याला मिळावा, असा त्यांचा आग्रह होता. परंतु, प्रशासनाने हा बंगला अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना बहाल केला आहे. राणीच्या बागेत असलेल्या तीन बंगल्यांपैकी एक महापौरांकडे, दुसरा ढाकणे यांच्याकडे तर तिसऱ्या बंगल्यात आरोग्य विभागाचे उपसंचालक राहत असल्याने उपमहापौरांचा पत्ता कट झाला आहे.
या सर्व घडामोडींनंतर आणि मागणी फेटाळली गेल्यानंतर उपमहापौरांनी आता शहर भागातील इतर शासकीय बंगल्यांची चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेच्या जल विभागाचे मलबार हिल आणि वरळी परिसरात असलेले तीन बंगले उपमहापौरांना देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर चाचपणी सुरू झाली आहे. मात्र, राणीच्या बागेतील बंगला नाकारल्यामुळे उपमहापौर घाडी आणि आयुक्त भिडे यांच्यातील दरी अधिक रुंदावल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
