महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या समर्थना मुळे राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई नाही – मनोज जरांगे यांची सरकारवर टीका

    मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजूनही कारवाई झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सोलापूरकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप त्यांनी केला.

 सरकारवर पक्षपाती पणाचा आरोप

मनोज जरांगे म्हणाले, “ही सरकारने तयार केलेली एक टोळी आहे. यात वकील आहेत, स्वतःला अभ्यासक म्हणवणारे लोक आहेत आणि साहित्यिक म्हणून नाव लावणारे लोक आहेत. यांच्यावर सरकारचा आशीर्वाद आहे, त्यामुळेच राहुल सोलापूरकर सुटले आहेत.”

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्या मध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचे सांगितल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, याआधी अनेक प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झाली, पण सोलापूरकर यांना मात्र सूट देण्यात आली, असे जरांगे यांनी सांगितले.

 “हे सरकार तिरस्काराने भरलेले आहे” – जरांगे

जरांगे पुढे म्हणाले, “हे सरकार तिरस्काराने भरलेले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजां बद्दलचा विषय असो, सरकारची भूमिका पक्षपाती आहे. अनेक प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई केली जाते, पण सोलापूरकर यांच्यावर मात्र अजूनही कारवाई नाही.”

 शिवजयंती उत्सवात सरकारवर हल्लाबोल

मनोज जरांगे धाराशिव जिल्ह्यात शिवजयंती उत्सवानिमित्त बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एका चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी केली. तसेच, ते म्हणाले, “आज चांगला दिवस आहे, पण काही मंत्र्यांची नावे घेऊन वातावरण खराब करायचं नाही.”

दरम्यान, जरांगे यांच्या उपस्थितीत धाराशिव आणि नरसी येथे मोठ्या प्रमाणावर शिवजयंती कार्यक्रम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून लोक या कार्यक्रमात सहभागी झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही लवकरच मोठी लढाई लढणार असल्याचे संकेत जरांगे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!