महत्त्वाच्या बातम्या

मोदी-इराण राष्ट्राध्यक्ष भेट; पश्चिम आशियातील संघर्ष संवादातून सोडवण्यावर भारताचा भर

नवी दिल्ली: किर्गिस्तान मधील बिश्केक येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषद आणि ‘एससीओ प्लस’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली. या उच्चस्तरीय भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंसह पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर सविस्तर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी यावेळी पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातूनच सोडवला जावा, या भारताच्या सातत्य पूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला असून नौवहन व व्यापाराचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यावर विशेष भर दिला आहे.

       परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदना नुसार, इराण विरुद्ध सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत प्रादेशिक सुरक्षिततेचा आढावा घेताना जागतिक जहाज वाहतुकीसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ परिसरातील सुरक्षित नौवहन आणि व्यापाराचे स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केली. यापूर्वीही दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून अनेकदा संवाद झाला असून, प्रादेशिक स्थिरता राखण्या बाबत नेहमीच सकारात्मक चर्चा झाली आहे. या परिषदेच्या निमित्ताने झालेल्या प्रत्यक्ष भेटीमुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक संवाद अधिक दृढ झाला आहे.

       दौऱ्यावर निघण्यापूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी आपल्या भूमिके बाबत स्पष्ट भाष्य करताना, इराणला युद्धाची कोणतीही इच्छा नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, देशावर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला पूर्ण ताकदीने आणि दृढनिश्चयाने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. पश्चिम आशियातील सद्यस्थितीतील अस्थिरता सर्वच देशांसाठी अत्यंत हानिकारक असल्याचे नमूद करत, आर्थिक व सुरक्षाविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परस्पर सहकार्य आणि एकजुटीची गरज त्यांनी अधोरेखित केली होती. जागतिक पटलावर विविध आणि स्वतंत्र आवाज अस्तित्वात असल्याचे प्रतीक म्हणून या महत्त्वाच्या परिषदेकडे पाहिले जात असून, या बैठकीमुळे भारत-इराण संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!