मोबाईल हस्तगत करण्यात दहिवडी पोलिस ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर
दहिवडी: दहिवडी पोलिस ठाणे हे सीईआयआर पोर्टल (CEIR Portal) चा वापर करुन मोबाईल हस्तगत करण्यात सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलिस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारल्या पासून दहिवडी पोलिस ठाण्यात सीईआयआर पोर्टल (CEIR Portal) चे काम पाहणारे पोलिस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यानुसार दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणी हरवलेले मोबाईल ज्यांनी पोलिस ठाण्यात नोंदणी केली आहे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. भारत सरकार दुर संचार विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या सीईआयआर पोर्टल (CEIR Portal) चा यासाठी वापर करण्यात आला. या पोर्टलच्या सहाय्याने गहाळ झालेले मोबाईल हे राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हैद्राबाद, जामखेड, उस्मानाबाद, सांगली, पंढरपुर, मुंबई, पश्चिम बंगाल, जम्मु काश्मिर येथून परत मिळविण्यात आले. जानेवारी २०२५ ते आज अखेर एकूण १५ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ७७ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. आणि ज्यांचे मोबाईल हरवले होते त्या नागरीकांना ते परत करण्यात आले आहेत. मोबाईल हस्तगत करुन नागरीकांना परत करण्यामध्ये दहिवडी पोलिस ठाणे सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
