महत्त्वाच्या बातम्या

येरवडा कारागृहात बंदीजन घडवणार पर्यावरणपूरक बाप्पा; परिवर्तनाचा संदेश

पुणे: रागाच्या किंवा नकळत घडलेल्या चुकीची शिक्षा भोगत असताना माणसातील चांगुलपण आणि उपजत कलागुण कधीही नष्ट होत नाहीत, याचे एक अतिशय प्रेरणादायी उदाहरण सध्या पुणे शहरात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र कारागृह प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांच्या हातून यंदा अत्यंत आकर्षक आणि पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे एका बाजूला शिक्षेची जाणीव ठेवून प्रायश्चित्त घेणाऱ्या बंदी बांधवांच्या हातून एक सुंदर कलाकृती घडत आहे, तर दुसरीकडे त्यांच्यातील सकारात्मक परिवर्तनाचा मार्ग अधिक सुकर होत आहे.

        महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान (पुणे) आणि आदर्श मित्र मंडळ (पुणे) यांच्या संयुक्त सहकार्याने गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रेरणापथ’ हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा कारागृहातील बंदी बांधवांना मूर्तिकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. कोणतीही पूर्वतयारी नसताना या बांधवांनी अत्यंत समर्पित भावनेने घेतलेल्या प्रशिक्षणातून व्यावसायिक शिल्पकारांना लाजवतील अशा सुबक, देखण्या आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, विराज खटावकर, पुंडलिक खलोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदी बांधवांना या कलेचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

       गुन्हेगारी जगतातून बाहेर पडून आपल्यातील चांगला माणूस जागा करणे, आपल्या हातांनी काहीतरी सर्जनशील निर्माण करून समाजाशी पुन्हा तुटलेले नाते जोडणे, हा या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याविषयी बोलताना कारागृह सुधार सेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, महानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ आणि अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे. बंदी बांधवांच्या मनःस्वास्थ्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उपक्रमातून तयार झालेली बाप्पाची मूर्ती नागरिकांनी भक्तिभावाने आपल्या घरी स्थापन करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

        समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्यासाठी धडपडणाऱ्या या बंदी बांधवांच्या हाताला काम आणि सन्मान मिळवून देण्यासाठी या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींची विक्री गायत्री क्लिनिक (खडक माळ, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी रोड, पुणे) येथील स्टॉलवर सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या या शाडू मातीच्या मूर्तींची खरेदी करून नागरिकांनी या सामाजिक आणि संवेदनशील उपक्रमाला भरघोस पाठबळ द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!