रवींद्र धंगेकर यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चा तापल्या काँग्रेसला धक्का बसणार?
पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट मुंबईतील शासकीय निवासस्थानी झाली. विशेष म्हणजे, या भेटीत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर देखील उपस्थित होते.या भेटीनंतर चर्चांना जोर धरला असून, धंगेकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींनी असा अंदाज वर्तवला आहे की, काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसणार आहे.
धंगेकर यांचे स्पष्टीकरण – “मी लपून जाणार नाही”
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले की, ते कुठेही लपून जाणार नाहीत आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेतील.
ते म्हणाले,
“माझ्या स्टेटसवर एक फोटो टाकल्याने गैरसमज पसरला. मला तो फोटो चांगला वाटला म्हणून मी तो स्टेटसला ठेवला. त्यानंतर काहींनी चर्चा सुरू केली की, मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. पण ही अफवा आहे. माझे अजित दादांशीही चांगले संबंध आहेत.”
धंगेकर यांनी सांगितले की, शिवजयंतीच्या निमित्ताने एका छोट्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यावेळी घेतलेला फोटो त्यांनी स्टेटसवर ठेवला, आणि त्यावरूनच गैरसमज निर्माण झाला.
काँग्रेससाठी धोक्याची घंटा?
धंगेकर यांच्या या भेटीमुळे पुण्यात काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काँग्रेसमधील काही नेतेही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुण्यात राजकीय भूकंप होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
