राजाराम पुलाजवळ सिमेंट मिक्सरची दुचाकीला धडक; ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू, अवजड वाहनांच्या नियमभंगाचा प्रश्न ऐरणीवर
पुणे: पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत्या रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, वारजे परिसरातील राजाराम पुलानजीक घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी अपघातात ४७ वर्षीय महिला दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा भीषण अपघात घडला असून, याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात संबंधित सिमेंट मिक्सर चालका विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात जड व अवजड वाहनांच्या अनियंत्रित वेगामुळे आणि प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निष्पाप नागरिकांचे प्राण जात असल्याने पुणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, सुषमा संदेश पोखरकर (वय ४७, रा. रॉयल हाईट्स, आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे) असे मृत पावलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. या दुर्घटने बाबत त्यांच्या ५० वर्षीय पती संदेश पोखरकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. गत २३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुषमा पोखरकर या आपल्या दुचाकीवरून कर्वेनगर भागातून सिंहगड रस्त्याकडे जात असताना हा अपघात घडला. त्या राजाराम पूल परिसरात आल्या असता, अत्यंत वेगात आणि अनियंत्रित पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या एका सिमेंट मिक्सरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत पोखरकर रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेमात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी किंवा उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे उपस्थित वैद्याकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
याप्रकरणी वारजे पोलिसांनी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. दरम्यान, पुणे शहरामध्ये दिवसाच्या वेळेत सिमेंट मिक्सर, वॉटर टँकर, डंपर आणि इतर जड तसेच अवजड वाहनांच्या शहरांतर्गत वाहतुकीवर प्रशासना कडून स्पष्ट निर्बंध व वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. असे असतानाही सर्रासपणे दिवसाढवळ्या ही अवजड वाहने भरधाव वेगाने रहदारीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यांवर धावत असल्याचे पुन्हा एकदा या दुर्घटनेमुळे सिद्ध झाले आहे. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई कधी होणार आणि सामान्य नागरिकांचा जीव असाच ट्रॅफिकच्या विळख्यात धोक्यात राहणार का, असा संतप्त सवाल आता सुजाण नागरिका कडून व वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
