राष्ट्रवादीचे अजित पवार यास अटक; जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात दहिवडी नगरपंचायतीचा माजी नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित पवार यास आज अटक करण्यात आली आहे. मंत्री गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याच्या दिलेल्या तक्रारीवरून तुषार खरात, अनिल सुभेदार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिलेली संबंधित महिला यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित पवार यास दहिवडी पोलिसांनी आज अटक केली.
दहिवडी पोलिसांनी खंडणी प्रकरणातील आरोपींच्या संभाषणाची कॉल डिटेल्स सीडीआर प्रणालीद्वारे मिळवून आजपर्यंत या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
माणमधील आणखी काही मासे गळाला लागणार?
या प्रकरणांमध्ये अटकेत असलेली आरोपी महिला व तुषार खरात यांना पाठीशी घालणारे व त्यांना वारंवार फोनवरून व भेटून सहकार्य करणारे अशा व्यक्तीचे कॉल रेकॉर्डिंग तपासले असता माणमधील अनेक काही छोट्या मोठ्या राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याची चर्चा प्रत्येक चौका चौकात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आणखी काही मालामाल होण्यासाठी धावपळ करणारे हिस्सेदार सहभागी असल्याची चर्चा सुरू आहे.
