महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीच्या नाशिक अधिवेशनाची जय्यत तयारी; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पक्षबांधणीवर भर

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड समोर येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या राजकीय वाटचाली संदर्भात एक मोठा रणनीतिक निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची आणि राज्याची संपूर्ण धुरा खांद्यावर घेतलेल्या सुनेत्रा पवार यांचे आता नव्या दमाने आणि नव्या रणनीतीसह ‘रिलॉन्चिंग’ केले जाणार आहे. आगामी २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य राज्यस्तरीय अधिवेशनातून या विशेष अभियानाची अधिकृत घोषणा केली जाणार असून, ‘आपल्या वहिनी आहेत ना !’ या अत्यंत भावनिक आणि जनमानसात थेट भिडणाऱ्या नव्या घोषवाक्यासाह हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे.

        अजित पवार यांच्या अकस्मात निधना नंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढताना सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली खरी, मात्र राजकीय वर्तुळात त्या तुलनेने नवीन असल्याने त्यांच्या नेतृत्वा बाबत विरोधकां कडून विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या टिकेमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, पक्षांतर्गत वाढलेली धुसफूस आणि गटतट सावरण्यासाठी राष्ट्रवादीने आता कंबर कसली आहे. पक्षातील सर्व घटकांना एकत्र बांधत सुनेत्रा पवार यांची जनमानसातली प्रतिमा अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी हे विशेष रिलॉन्चिंग कॅपेन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

      या संपूर्ण मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कँपेन देशातील ख्यातनाम निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली डिझाइन करण्यात आले आहे. प्रशांत किशोर यांच्या ‘मॅट्रिझ’ (Matriz) या संस्थेची यंत्रणा या रणनीतीमागे कार्यरत असणार आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अजित पवार यांनी गुलाबी रंगाचा प्रभावी वापर करत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक यशस्वी प्रयोग केला होता. अजित दादांच्या सभांचे स्टेज, बॅनर्स, प्रचार गाड्या आणि साहित्य पूर्णपणे गुलाबी रंगात रंगवून एक वेगळी ब्रँडिंग तयार करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी देखील एक नवीन आणि प्रभावी राजकीय ब्रँडिंग तयार करण्यात येत आहे.

      पूर्वी ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा राष्ट्रवादीच्या प्रत्येक जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या तोंडी असे आणि पक्षाच्या प्रत्येक बॅनरवर झळकत असे. परंतु, आता राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे ‘आपल्या वहिनी आहेत ना !’ या नव्या आणि आपुलकीच्या नारा देऊन महाराष्ट्रातील घराघरांपर्यंत आणि विशेषतः महिला वर्गापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नाशिक येथील आगामी अधिवेशनातून या अभियानाची अधिकृत सुरुवात झाल्यानंतर राज्यभरात सुनेत्रा पवार यांचे विशेष दौरे आयोजित केले जाणार आहेत. या रणनीतीमुळे विरोधकांच्या टीकेला राजकीय उत्तर देतानाच पक्षातील अंतर्गत सुसंवाद वाढवण्यास आणि आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!