राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू – शरद पवार गटाचा बडा नेता अजित पवार गटात?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील काही मोठे नेते अजित पवार गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. या चर्चांना अधिक बळ देत, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “आमच्या पक्षात इनकमिंग सुरू आहे. शरद पवार गटातील एका बड्या नेत्याच्या प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेऊ.” रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे निंबाळकर यांनीही अजित पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचे तटकरे यांनी नमूद केले. यामुळे दोन्ही गटांमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर या हालचाली अधिक महत्त्वाच्या ठरल्या आहेत. सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना विचारात घेऊनच पक्षप्रवेशाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांमध्ये संघर्षाची नवी फेरी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
