राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडीच्या आर्यन राठोडचे दैदिप्यमान यश; ३ मिनिटांत सोडवली १०० गणिते
दहिवडी: अकलूज येथे संपन्न झालेल्या ‘आय चँप अबॅकस प्रा. लि.’ आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दहिवडी शाखेच्या आर्यन रूपेश राठोड याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. आर्यनने अवघ्या ३ मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवण्याचा पराक्रम केला असून, या यशाबद्दल त्याला गौरव म्हणून सायकल प्रदान करण्यात आली.
दहिवडी शाखेचा दुहेरी धमाका
आर्यनच्या वैयक्तिक यशासोबतच, दहिवडी शाखेने सांघिक पातळीवरही आपली मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट व्यवस्थापन आणि मार्गदर्शनासाठी दहिवडी शाखेला ‘बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. या यशात शाखेच्या संचालिका सौ. राजश्री देशमुख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
दिग्गजांच्या हस्ते पारितोषिक वितरण….
अकलूज येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील (अध्यक्षा, प्रताप क्रीडा मंडळ)
श्रीमती शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील (अध्यक्षा, शिवरत्न शिक्षण संस्था) चि. सयाजीराजे मोहिते पाटील (नगरसेवक, अकलूज नगरपरिषद) या मान्यवरांच्या हस्ते आर्यन राठोड आणि दहिवडी शाखेला सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन ‘आय चँप अबॅकस’चे डायरेक्टर विशाल माने आणि संचालिका स्नेहल माने यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. आर्यनच्या या यशाबद्दल दहिवडी परिसरातून त्याचे कौतुक होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
