महत्त्वाच्या बातम्या

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

मुंबई: पुणे जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या निवासस्थाना जवळच दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या,अपूर्ण पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची पूर्तता कालबद्ध पद्धतीने करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रस्तावांवर दिरंगाई न करता तत्परतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी यावेळी सुनावले.

          या बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार सुनील टिंगरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती जितेंद्र बडेकर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तसेच जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध प्रकल्पांचा आणि प्रलंबित मागण्याचासविस्तर आढावा घेण्यात आला.

         लोहगाव परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाय योजना करण्याचे आदेश दिले. तसेच राजगड (वेल्हे) येथील नवीन ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन इमारत व आवश्यक पदे मंजूर करण्याची प्रक्रिया राबवावी, चाकण उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करून पद निर्मिती करावी आणि खेड तालुक्यातील महाळुंगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एमआयडीसीची जागा जिल्हा परिषदेकडे त्वरित वर्ग करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. खेड तालुक्यातील औद्योगिक पट्टा आणि दुर्गम भागाचा वाढता विस्तार लक्षात घेता आंबेठाण येथे आरोग्य उपकेंद्रास तातडीने मंजुरी देण्या बाबतही त्यांनी निर्देशीत केले.

       याशिवाय, खेड-राजगुरूनगर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी, जिल्ह्यात नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्थलांतराचे प्रस्ताव मार्गी लावावेत आणि एएनएम केंद्रांवरील पदभरतीस लवकरात लवकर परवानगी द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जन्मनोंदणी दरम्यान ‘सीआरएस’ (CRS) प्रणालीत आधार नोंदणी न होण्यामुळे बालकांच्या जन्म नोंदणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया सुरळीत करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला. दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी खेड तालुक्यातील पाईट येथे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध करून देण्यात यावी, असे सांगण्यात आले. आरोग्य विषयक या सर्व निर्णयांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे, अशी ताकीदही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!