महत्त्वाच्या बातम्या

वारकरी सांप्रदायाच्या कार्यात बाबामहाराजांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही – महंतश्री प्रमोद महाराज जगताप

वारकरी संप्रदायामध्ये भक्ती बरोबरच त्यागाला अत्यंत महत्व असून बाबामहाराज गजवडीकर यांनी केलेला त्याग व सदगुरू पुंडलीक महाराज वेळूकर यांच्या कार्यात घेतलेला सहभाग आणि त्याबरोबरच हरिपाठ,कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संताचे विचार पोहचविण्याच्या कार्यामुळे त्यांचे कार्य विसरता येणार नाही असे प्रतिपादन महंत श्री प्रमोद महाराज जगताप यांनी वेळू येथे बोलताना केले.

 

 पारायणाचार्य सदगुरू पुंडलीक महाराज वेळूकर यांच्या १९ व्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने वेळू ता.कोरेगाव येथे दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महंत श्री प्रमोद महाराज जगताप यांचे कीर्तन झाले. या कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी पारायणाचार्य पुंडलीक महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून त्यांच्या स्मृती जागवल्या. तदनंतर प्रतिवर्षाप्रमाणे सदगुरू पुंडलीक महाराज वेळूकर कार्यगौरव पुरस्कार जेष्ठ कीर्तनकार गुरूवर्य बाबा महाराज गजवडीकर यांना महंतश्री श्रीप्रमोद महाराज जगताप यांचे शुभहस्ते देण्यात आला.या प्रसंगी धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले,व्यसनमुक्त युवक संघाचे विलासबाबा जवळ, राजेंद्र शेलार, मधुसूदन मोहिते पाटील, राजेंद्रजी सोळसकर बारामती, विक्रम घोरपडे, इ.मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना महंत श्री प्रमोद महाराज जगताप म्हणाले, बाबामहाराज गजवडीकर यांनी वारकरी संप्रदायासाठी खुप मोठे योगदान दिले असून पारायणाचार्य पुंडलीक महाराजांच्या अनेक कार्यक्रमात सहभागी होत कठीण प्रसंगी घरातील पत्नीचे दागिने गहाण ठेवले. याच्यातून त्यांचा त्याग लक्षात येतो तसेच कीर्तन,प्रवचना बरोबरच गजवडीकरांनी हरिपाठातून वारकर्‍यांना आनंद देण्याचे मोठे काम केले असल्याने वारकरी संप्रदायात त्यांना हरिपाठानंद अशी बिरूदावली दिली असल्याचे सांगितले. पारायणाचार्य पुंडलीक महाराजांच्या नावाने दिला गेलेला कार्यगौरव पुरस्कार हे माझ्या सेवेचे फळ असल्याचे सांगून अनेक गावांमध्ये स्वखर्चाने पारायणाचार्य पुंडलिक महाराजांच्या समवेत जाऊन ज्ञानेश्वरी पारायणाचे कार्यक्रम सुरू केले. अनेक गावांमध्ये जाऊन वारकरी संप्रदायाचे कार्य केले. याप्रसंगी त्यांनी निवड समितीचे आभार मानले.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मृदंगाचार्य मदनराव कदम यांनी केले. तसेच प्रास्ताविक संजय महाराज वेळूकर यांनी केले. आभार अमोल भोसले यांनी मानले.या कार्यक्रमाला अनेक किर्तन, प्रवचनकार विविध गावची भजनी मंडळे ,वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!