महत्त्वाच्या बातम्या

विचार करायला शिकवणारे शिक्षण काळाची गरज; ४२ शिक्षक सन्मानित

पुणे: विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देण्याची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले आहे. पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तब्बल १४ वर्षांच्या खंडित परंपरा नंतर पुन्हा सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यातील ४२ गुणवंत प्राध्यापक व शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊनगौरविण्यात आले. यावेळी आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांच्यासह उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. किशोर इंगळे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर आणि सचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

          शिक्षक आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री पाटील म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचे मोठे भांडार उपलब्ध असले तरी शिक्षकांचे समाजातील आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्थान कधीही कमी होऊ शकत नाही. उलट बदलत्या काळानुसार शिक्षकांवर नव्या आणि अधिक जबाबदाऱ्या आल्या आहेत. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करून देणे गरजेचे आहे. गणेशोत्सवा सारखे सण केवळ डीजे आणि आरडा ओरडय़ापुरता मर्यादित न राहता त्यामागील सांस्कृतिक, धार्मिक व वैज्ञानिक पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगत त्यांनी आजच्या तरुण पिढीत निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेच्या भावनेवर चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे समजून घेऊन शिक्षकांनी त्यांना योग्य ते मानसिक व शैक्षणिक मार्गदर्शन करणे काळाची गरज बनली आहे, असे त्यांनी नमूद केले.

        या कार्यक्रमा दरम्यान शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक उपक्रमांत महत्त्वपूर्ण घोषणा करताना मंत्री पाटील यांनी, पुढील वर्षापासून उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे नवीन पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच, शैक्षणिक व्यवस्थेत पाठीमागून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार‘ देखील पुढील वर्षापासून प्रदान केला जाईल, अशी घोषणा केली. एकल पालक कुटुंबांच्या समस्यांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचने नुसार एकल पालक योजनेसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, कोथरूड परिसरातील सुमारे ९५० एकल मातांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी अशा कुटुंबांना व्यापक आधार देण्याची भूमिका शासनाकडून पार पाडली जात आहे.

        प्रास्ताविकात बोलताना उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष पुढाकारातून २०१२ पासून बंद पडलेली शिक्षक पुरस्काराची ही परंपरा तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा दिमाखात सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अत्यंत कठोर, पारदर्शक आणि बहुस्तरीय छाननी प्रक्रियेतून राज्यभरातून ४२ शिक्षकांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी शिक्षकांच्या या सन्मानामुळे त्यांच्या संपूर्ण परिवाराचा गौरव होत असल्याचे मत व्यक्त केले, तर पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉ. देविदास वायदंडे आणि अंजली जोशी यांनी आपल्या मनोगतातून या पुरस्कारांमुळे शिक्षकांच्या सामाजिक जाणिवांना आणि संशोधक वृत्तीला मोठी प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!