विद्यापीठाचे माजी प्रा – कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. श. ना. नवलगुंदकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे: माजी प्रा – कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. श. ना. नवलगुंदकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ.प्रभाकर देसाई आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख आदीनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. नवलगुंदकरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. तसेच त्यांनी विद्यापीठामधील त्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजातही मोलाचे योगदान दिले असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. गोसावी यांनी त्यांना आदरांजली वाहताना सांगितले.
विद्यापीठाचे माजी प्रा – कुलगुरू डॉ. श. ना. नवलगुंदकर यांचे शनिवार, दिनांक ५ जुलै रोजी वयाच्या ९० व्या वर्षी दुःखद निधन झाले. दिवंगत डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्र्वर सभागृहात साय. ५. ०० वाजता दुःखवट्याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत डॉ. नवलगुंदकर यांनी सन १९८७ ते १९८८ या कालावधीत विद्यापीठाचे प्रा- कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडली.
