महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी दिशा; दहावीच्या विद्यार्थिनी सृष्टी कुंभारचा पवारवाडीत कौतुकास्पद उपक्रम

सातारा: आजच्या आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रात वेगाने पाय पसरत आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना त्याचे योग्य ज्ञान व्हावे, या उद्देशाने जावली तालुक्यातील पवारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एका विशेष एआय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. लिंब येथील प्रसिद्ध प्रतापसिंह हायस्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेणाऱ्या गुणी विद्यार्थिनी सृष्टी कुंभार हिने या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एआयच्या अथांग विश्वाची ओळख करून देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणारा हा उपक्रम सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

      या मार्गदर्शन शिबिरामध्ये सृष्टी कुंभार हिने कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध पैलू, त्याचा अभ्यास, दैनंदिन जीवनातील उपयोग, शिक्षण क्षेत्रातील त्याचे महत्त्व तसेच तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व सुरक्षित वापर कसा करावा, याविषयी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. शिबिरात उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सृष्टीने अत्यंत आत्मविश्वासाने आणि तत्काळ उत्तरे देत त्यांच्या शंकांचे उत्तम निरसन केले. सृष्टी ही पवारवाडीचे तलाठी गोरक्षनाथ कुंभार यांची कन्या असून, तिने स्वतः एआयचा सखोल अभ्यास केला आहे. तिच्या या ज्ञानार्जनात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या एआय प्रकल्पाचा आणि शाळेच्या मार्गदर्शनाचा मोठा सहभाग लाभला आहे. विद्यालयाचे एआय विभाग प्रमुख किरण गायकवाड, प्रकल्प प्रमुख दादासाहेब कचरे, वर्गशिक्षिका मनीषा साळुंखे आणि मुख्याध्यापक श्यामराव गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला मिळाले.

     इंग्रजी भाषेवरील मजबूत प्रभुत्व आणि तंत्रज्ञानातील तीव्र रुची यामुळे सृष्टी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुण पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देत आहे. तिच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक आणि एआय तंत्रज्ञानाची अगदी जवळून ओळख होत असून त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर येत आहेत. सृष्टीच्या या प्रेरणादायी आणि ज्ञानदायी उपक्रमाचे चीज करत पवारवाडी ग्रामस्थ, न्यू इंग्लिश स्कूल तसेच प्राथमिक शाळेच्या वतीने तिचा सस्नेह सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. एका तरुण विद्यार्थिनीने हाती घेतलेल्या या तंत्रज्ञान साक्षरतेच्या मोहिमे मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!