विरमाडेकरांची रस्ता ओलांडताना जीवघेणी कसरत
पुणे बंगलोर महामार्गावर असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्याजवळ विरमाडे ता. वाई येथील ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने महामार्गावरूनच धोकादायकपणे जीवघेणी कसरत करावी लागत आहे. महामार्गाचे सहापदरीकरण करताना अनेक ठिकाणी त्रुटी ठेवल्या आहेत. यामध्ये टोलपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या विरमाडे ग्रामस्थांची अक्षरशः मोठी अडचण झाली आहे. त्यांना शेती कामासाठी, बाहेरगावी जाताना रस्ता ओलांडून जावे लागते. या ठिकाणी भुयारी मार्ग आहे मात्र कायमच त्या मार्गात चिखलाचे साम्राज्य असते,व हा मार्ग खूप छोटा असल्याने बैलगाडी, ट्रॅक्टर सारख्या वाहनांनाही तेथून जाता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थ, महिला, तरुण, विध्यार्थीनी,जेष्ठ नागरिक महामार्गावरून धोकादायकपणे ये जा करत असतात. दुचाकी चालकांची तर मोठीच अडचण होत आहे. टोल नाका पास केला की महामार्गावरुन वाहने पुण्याच्या दिशेला वेगाने धाव घेतात. तर पुण्याकडून येणारी वाहने देखील भरधावं येत असतात. या जीवघेण्या मार्गातून ग्रामस्थांना ये जा करावी लागते. येथे अपघात परिस्थिती निर्माण झाली असून रोज अपघात घडत असतात.
विरमाडे गावातील अनेकजन या अपघातात मरण पावले आहेत. तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. अनेक कुटुंबं देखील यामुळे वाऱ्यावर आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा याबदल टोल नाका व्यवस्थापन सबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करून येथे मोठा भुयारी मार्ग किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करावा अशी मागणी केली होती. परंतु त्याकडे संबंधितांनी डोळेझाक केल्याचे दिसत आहे.
गावच्या प्रवेशद्वारावर मोठ मोठी वाहने आडवी उभी असतात. या वाहनांचे चालक व इतर प्रवाशी रस्त्यावरच लघुशन्का करताच.यामुळे गावातील येणाऱ्या जाणाऱ्या महिला ग्रामस्थांना अडचण निर्माण होते.तसेच यामुळे प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरली आहे. शाळा कॉलेजला जाणारे विध्यार्थी, विध्यार्थीनींना याचा जास्त त्रास होतो. पुण्याकडून येणारा मार्ग अरुंद आहे त्यामुळे तेथेच जास्त धोका निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. बस थांब्याची सोय देखील नाही. पुण्याकडे जाणारा बस थांबा फाट्यापासून खुप लांब असल्याने रस्त्यातच थांबणाऱ्या वाहनांची प्रवाशांना रस्त्यामध्ये येऊन वाट पहावी लागते.
वाई तालुक्यात असणाऱ्या विरमाडे गावाची ही धोकादायक अवस्था पाहता नुकतेच मंत्री म्हणून शपविधी झालेले आ.मकरंद पाटील यांनी हा गंभीर प्रश्न आतातरी सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विरमाडे येथून कृष्णा नदीकडे जाणारा हाच मार्ग आहे. स्मशानभूमीसुद्धा तिकडेच आहे. या महामार्गावरूनच पुढे जावे लागते.जेष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळी नदीकिनारी फिरण्यासाठी जात असतात. शेती कामासाठी लोकांना जावे लागत असल्याने धोकादायक मार्ग ओलांडून जाताना जीव मुठीत धरून जावे लागते.किमान भुयारी मार्ग मोठा तरी असावा. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
