वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात नैतिकता व जीवनमूल्यांचे पालन महत्वाचे” प्रो.डॉ.अरविंद जाधव
व्यक्तींनी वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात नैतिकता व जीवनमूल्यांचे पालन करणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन कराडच्या यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ .अरविंद जाधव यांनी केले.ते नागठाणे कॉलेज मध्ये अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत व्यावसायिक नैतिकता आणि जीवनमूल्ये या विषयावर बोलत होते.
ते पुढे म्हणाले, माणसाने स्वतःशी, आपल्या कामाशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे. तसेच आजच्या काळात ज्ञान हीच संपत्ती आहे. त्यामुळे ज्ञानाधिष्ठित व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशामध्ये एकमेकांप्रती सौजन्य राखत विश्वबंधुत्वाची भावना जोपासत वैश्विक नागरिक बनले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड म्हणाले की, गौतम बुद्ध, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी दिलेल्या पंचशील तत्वांचा उपयोग जीवनात करणे आवश्यक आहे.माणसाने आपल्या नैतिक मूल्यांना उजाळा देत राहणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ सुरेश पाटील यांनी केले,आभार अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा.संतोष निलाखे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.मनिषा सुतार यांनी केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
