महत्त्वाच्या बातम्या

शिंदे गेले की फडणवीस जातात…. देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंचा टोला

मुंबई: देशभर गाजलेल्या नीट (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका लीक प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी हलचल निर्माण झाली आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता देशाचे नवे शिक्षणमंत्री कोण होणार? याबद्दलच्या चर्चांना उधाण आले असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही महत्त्वाची केंद्रीय जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी यावर आपल्या खास शैलीत मजेशीर आणि खणखणीत उत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदेत माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याच्या आणि शिक्षणमंत्रिपद स्वीकारण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, राज ठाकरे यांनी अत्यंत मिश्किल टिप्पणी करत म्हटले की, सध्या त्यांच्यामध्ये एक चुरस सुरू असते, जेव्हा शिंदे दिल्लीला जातात तेव्हा फडणवीस मागे राहतात आणि जेव्हा फडणवीस जातात तेव्हा शिंदे मागे येतात, त्यामुळे सध्याच्या या राजकीय स्थितीत ते नेमके का गेले हे तेच उत्तम प्रकारे सांगू शकतील. याशिवाय, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतरही उद्या मुंबईत नियोजित असलेला मोर्चा होणार का, यावर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, उद्या शिवाजी पार्क मैदान परिसरातील वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ उभारले जाईल आणि सर्वजण तिथे एकत्र जमतील. हा संपूर्ण लढा देशातील तरुण पिढीचा (Gen Z) आणि ‘कॉकरोच जनता पार्टी‘चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाचा मोठा विजय असल्याचे सांगत, “एका वाक्यात सांगायचे तर या तरुण पिढीने मस्तीत असलेल्या सरकारच्या झिंज्या उपटून त्याला जमिनीवर आणले आहे,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच, कालच आपण म्हटले होते की हा रोष केवळ शिक्षणमंत्र्यांपुरता मर्यादित न राहता थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे, आणि यापुढील आंदोलनाची किंवा भूमिकेची दिशा आता अभिजित दिपकेच ठरवणार असून त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल, असेही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!