शिखर शिंगणापूर मध्ये दर्शन घेताना महिलेचे मंगळसूत्र चोरीला
शिखर शिंगणापूर (ता. माण ) येथे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली होती. सदर गुन्हातील संशयितास दहिवडी पोलीसांनी २४ तासात अटक केली आहे. सौ. शोभा तुकाराम काटकर रा. भादोले ता. हातकणंगले जि. कोल्हापूर या शिखर शिंगणापूर येथे शंभु महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिरा बाहेरील कासवाजवळ वाकून दर्शन घेत असताना गळ्यातील अडीच तोळ्याचे मिनी मंगळसूत्र कोणीतरी चोरल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदर घटनेची दखल घेत सपोनि. दत्तात्रय दराडे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली असता शिखर शिंगणापूर परिसरामध्ये एका अनोळखी महिलेचा संशय आल्यानंतर त्या महिलेची विचारपूस केल्यानंतर सुरुवातीला तिने उडवा-उडची उत्तरे द्यायला सुरुवात केली.नंन्तर तिची कसून चौकशी केल्यानंन्तर तिच्याकडे ते मंगळसूत्र आढळून आले. सदर चोरटी महिला इंदापूर तालुक्यातील साठेनगर आश्रम शाळेजवळ राहणारी असून दिलापली महेश शेंडगे (वय २८ ) असे तिचे नाव असून चोरीच्या उद्देशाने शिंगणापूर परिसरामध्ये वावरत होती. सदर महिला अट्टल चोरटी असल्याचा संशय आहे. सदर घटनेचा पुढील तपास सपोनि. दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. मोहन हांगे करत आहेत.
