महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची शिंदेंकडून उच्चस्तरीय बैठक; मंत्रालयात मोठी धावपळ

मुंबई:राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेली शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांची अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॅरेथॉन बैठकीमध्ये विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा अत्यंत सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीमुळे मागील काही तास मंत्रालयात मंत्री, त्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) आणि खाजगी सचिव (PS) यांच्यामध्ये मोठी धावपळ उडाली होती, कारण प्रत्येक विभागाची अद्ययावत माहिती आणि फाईल्स तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या संपूर्ण बैठकीमध्ये ‘शालेय शिक्षण विभाग’ हा सर्वाधिक चर्चेचा आणि केंद्रबिंदू असलेला विषय ठरल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाच्या कामकाजाचा विशेष आढावा घेण्यात आला असून, देशातील बदलत्या शिक्षण व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या सद्यस्थितीबाबत आणि आगामी उपक्रमांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह त्यांच्या विभागातील सर्व OSD आणि खाजगी सचिव या बैठकीला उपस्थित राहून विविध मुद्द्यांवर सविस्तर मंथन केले. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आणि घेतलेल्या निर्णयांचा आता राज्याच्या प्रशासनिक व राजकीय वर्तुळावर कसा प्रभाव पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!