महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांची जीभ घसरली; जयकुमार गोरेंच्या टीकेवर संतप्त प्रतिक्रिया

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या आक्रमक आणि रोखठोक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या आगामी निवडणुकीबाबत केलेल्या एका टीकेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांचा संताप अनावर झाला, आणि संतापलेल्या राऊतांची मीडियासमोर अचानक जीभ घसरली. जयकुमार गोरे यांच्यावर वैयक्तिक टीका करतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप सरकारवर अत्यंत कडक शब्दात निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी एका वक्तव्यात, आगामी निवडणूक उद्धव ठाकरे हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात लढतील, अशी खोचक टीका केली होती. मीडियाने याच विधानावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता, राऊत संतप्त झाले. गोरे यांच्यावर टीका करताना त्यांची भाषा घसरली आणि त्यांनी थेट अपमानकारक शब्दांत संताप व्यक्त केला. “तो काय बोलतोय त्याचे भान ठेवा, तुम्ही सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताय,” असे म्हणत राऊतांनी गोरेंवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाचा आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींचा विशेष उल्लेख केला. अभिजीत दिपकेने देशाच्या पंतप्रधानांना गुडघे टेकायला लावले आहे. दिपकेमुळेच पंतप्रधान आणि गृहमंत्री बिळात दडून बसले होते. या तरुणाला सर्वात आधी पाठिंबा देणारे आम्हीच होतो. हा तरुण भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही,” असा दावा त्यांनी केला. तसेच, पंतप्रधान मोदींनी एका व्हिडिओद्वारे शिव्या देणाऱ्या तरुणांना माफ केल्याची घोषणा केली होती, त्यावरही राऊतांनी तीव्र आक्षेप घेतला. आम्ही कधी माफी मागितली? मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलीच नाही. हे भ्रमिष्ट झाले आहेत, त्यांनी आपले सल्लागार बदलले पाहिजेत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांच्या मानसिक स्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही उपरोधिक आणि खोचक टीका केली. “चंद्रकांतदादा हे आता दगडाचे ठसे गोळा करणार आहेत. त्यांना अमित शाह यांनी हे काम दिले आहे. दादा चार ट्रक भरून दगड गोळा करणार असून ते महान वैज्ञानिक आहेत. त्यांच्यापुढे आता डॉ. एपीजे अब्दुल कलाम मागे पडले आहेत, आता लोक कलाम यांना विसरतील आणि चंद्रकांतदादांना विज्ञानातील पुरस्कार दिला पाहिजे,” अशा शब्दांत राऊतांनी त्यांना खिजवले. या संपूर्ण पत्रकार परिषदेतील त्यांच्या आक्रमक आणि टीकेच्या फैरींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!