सर्वांच्या प्रयत्नाने कुसूंबीची यात्रा सुरळीत पार पाडू — तहसीलदार हणमंत कोळेकर
कुसुंबी यात्रेसाठी सर्व विभाग आपापल्या क्षेत्रातील कामासाठी सज्ज असून प्रशासन तसेच सर्वांच्या सर्वांच्या प्रयत्नाने कुसुंबीची यात्रा सुरळीत पार पाडू असे प्रतिपादन जावली तालुक्याचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी केले आहे. कुसुंबी येथील काळेश्वरी देवीच्या यात्रा आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी या बैठकीसाठी गटविकास अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव, महावितरणचे अभियंता सुरेश कुंभार, बांधकाम विभागाचे अभियंता एम.एम. कोन्हाळीकर, एसटी आगार व्यवस्थापक नीता बाबर, वैद्यकीय अधिकारी अंकुर जगदाळे, तलाठी बाळासाहेब करचे, यांच्यासह कुसुंबीचे सरपंच मारुती चिकणे, पोलीस पाटील एकनाथ सुतार, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे सचिव किसनराव चिकणे, अध्यक्ष रामदास वेंदे यांच्या अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. क्षेत्र कुसुंबी ता. जावली येथील काळेश्वरी देवीची यात्रा ता.१५ व १६ फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यातून तसेच राज्याबाहेरून लाखो भाविक येत असतात. याच पार्श्वभूमीवर ही यात्रा सुरळीतपणे पार पडावी याकरिता यात्राकाळात जावलीतील प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा तसेच इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य विभागाकडून यात्राकाळात येणाऱ्या भाविकांसाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सहाय्यक यांची विशेष पथके तयार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. यादव यांनी दिली. यात्राकाळात येणाऱ्या भाविकांसाठी प्रवासाची गैरसोय होऊ नये याकरिता सातारा तसेच मेढ्यातून कुसुंबीला येण्यासाठी विशेष एसटी बसेस मेढा आगाराकडून उपलब्ध करणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक नीता बाबर यांनी दिली. तर महावितरणकडून यात्राकाळात अखंडित विद्युत पुरवठा सुरळीत राहील अशी ग्वाही दिली. तसेच यात्रेच्या पार्श्वभूमीवर विद्युत वाहिन्यांना स्पेसर बसविणे, लूज तारा ओढणे, पोल बदलणे इत्यादि कामे महावितरणकडून करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता सुरेश कुंभार यांनी दिली. तसेच यात्राकाळात चोख पोलीस बंदोबस्त असेल यासाठी वाई विभागीय कार्यलयाकडून अधिकचा पोलीस बंदोबस्त मागविणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले. तसेच यात्राकाळात शांतता व सुव्यवस्था बिघडविणारे कोणी असतील पण ते रेकॉर्डवर नसतील अशांचीही नावे पोलीस ठाण्याला कळवावीत असेही पाटील यांनी सांगितले.
तसेच कुसुंबी ग्रामपंचायतीकडून पाणी व्यवस्था, फिरते शौचालय व्यवस्था, पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याबाबतची माहिती कुसुंबी सरपंच मारुती चिकणे यांनी दिली. या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन काळेश्वरी देवस्थानचे विश्वस्त संतोष चिकणे यांनी केले तर आभार सरपंच मारुती चिकणे यांनी मानले.
फोटो:कुसूंबी: यात्रामार्गाची पाहणी करताना विविध शासकीय खात्यांचे अधिकारी..
