सातारा कोरेगाव रोडवरील पाईपलाईन फुटल्याने अपघाताची मालिका सुरूच
सातारा कोरेगाव रोडवरील संगमनगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात गेल्या तीन आठवड्यापासून गळत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण रस्त्यावर या गळतीमुळे चिखल व पाणी रस्त्यावर पसरल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी झाले होते. बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते माहुली दरम्यान स्वराज्य मंगल कार्यालया समोर पाण्याची गळती झाली होती त्याचा ही त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता.
या जलवाहिनी द्वारे कृष्णा नदीतील पाणी विसावा नाका जलशुद्धीकरण केंद्र येथे आणण्यात येते. सदर भुमीगत लाईन सातारा- लातूर या महामार्गाच्या कॉंक्रीटीकरणाच्या खाली गेल्याने गळती काढताना संपूर्ण काँक्रीट फोडावे लागत आहे.या संदर्भात अधिक माहिती घेतली असता सदर पाईपलाईन सातारा लातूर महामार्गाचे ठेकेदार मेघा इंजिनियरीग यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने नेमून दिलेल्या जागी ही जलवाहिनी टाकावयाची आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच मेघा इंजियरींग चे साईट इंजिनियर नायडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही वरिष्ठ अधिकारी सहकार्य करत नसल्याची कबुली दिली.या खोदकामा नंतर सदर मेघा इंजिनियरींग कंपनी काँक्रीटीकरण करण्यास दिरंगाई करते. त्यामुळे अपघाताची मालीका सुरुच आहे. तरी प्रशासनाने व लोकप्रतीनिधींनी यात लक्ष घालून अनेक दिवसापासून रखडलेले काम मार्गी लावावे अशी मागणी करण्यात येत आहे.
