सातारा जिल्ह्यातील ऑटो रिक्षा स्क्रॅप वयोमर्यादा 16 वरून 25 वर्षे करण्याची रिक्षा संघटनेची मागणी
राज्य शासनाने 2014-15 पासून पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांची स्क्रॅपची वयोमर्यादा सरसकट 16 वर्ष ठरवल्याने करोनानंतर जिद्दीने पुन्हा उभ्या राहिलेल्या रिक्षा चालकावर उपासमारीचे संकट उभे राहणार आहे. यासाठी सदरची वयोमर्यादा 25 करावी अशा मागणीचे निवेदन रिक्षा संघटनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांना देण्यात आले.
मुंबई येथील दमट वातावरणामुळे रिक्षा गंजण्याचे प्रमाण जास्त असून त्यामानाने सातारा येथील वाहने कोरड्या वातावरणामुळे लवकर गंजत नाहीत. त्यामुळे मुंबई येथील सरसकट सोळा वर्षांपूर्वीची रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय येथे राबविण्यात येऊ नये तसेच वर्षातून एकदा या रिक्षांची परिवहन विभागातर्फे फिटनेस चाचणी अधिकाऱ्या मार्फत प्रत्यक्ष रिक्षा चालवून करण्यात येते. त्यामुळे या फिटनेस चाचणीच्या वेळी त्यांनी ते वाहन योग्य की अयोग्य ठरवून कारवाई करावी. त्याचबरोबर पेट्रोल रिक्षा एलपीजी किंवा सीएनजी मध्ये कन्व्हर्ट करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सातारा शहरांमध्ये इलेक्ट्रिक रिक्षाचा शिरकाव झाल्यामुळे धंद्यातली स्पर्धा वाढवून धंदा मोडकळीस आला आहे. त्यातच शासनाने वयोमर्यादा सोळा च्या रिक्षा सरसकट स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतल्यास रिक्षा चालकांना उपजीविकेचे साधन राहणार नाही. त्यामुळे आर्थिक संकट उभे राहणार आहे. त्यावर राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे पदाधिकारी अशोक खैरमोडे, भास्कर गुरव, सुधीर साळेकर,.युवराज कांबळे, तैमुर शेख व रिक्षा चालक उपस्थित होते.
