महत्त्वाच्या बातम्या

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस

सातारा: सातारा अपडेट तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे  (डी.बी.) पथकाने धडक कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या संशयिताकडून चोरीच्या एकूण ४ दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवले असून, यामुळे सातारा तालुका आणि सातारा शहर पोलीस ठाण्यांतर्गत असणारे प्रत्येकी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.  

​या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समीर असीफ मुलाणी (रा. परळी, ता. जि. सातारा) यांनी परळी गावातील त्यांच्या राहत्या घराच्या अंगणातून हिरो कंपनीची ‘स्प्लेंडर’ मोटरसायकल (क्रमांक: MH-11-BM-0197) अज्ञात चोरट्याने लांबवल्याची तक्रार २९ मार्च २०२६ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असतानाच, चोरीची वाहन चालवणारा एक संशयित इसम सातारा शहराच्या हद्दीत फिरत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार डी.बी. पथकाने तातडीने चक्र फिरवली आणि मौजे कोडोली (ता. जि. सातारा) परिसरात सापळा रचून संशयित इसमासह त्या दुचाकीला ताब्यात घेतले.  

​ताब्यात घेतलेल्या संशयिताची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने एक नव्हे तर तब्बल चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे सातारा तालुका पोलीस ठाण्यातील २ आणि सातारा शहर पोलीस ठाण्यातील २ असे एकूण ४ दुचाकी चोरीचे गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले असून पोलीस हवालदार संदीप कर्णे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सदरची यशस्वी कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (सातारा विभाग) श्री. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, सफौ उमेश माने, पोहवा संदीप कर्णे व त्यांच्या संपूर्ण टीमने केली आहे. या धडक कामगिरी बद्दल सर्व अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!