साताऱ्यातील नागठाणे येथील उड्डाणपुलाचे काम ठप्प…स्थानिकांनी केला ठेकेदार कंपनीवर आरोप
नागठाणे येथील पुणे बेंगलोर NH4 महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम दोन महिन्यांपासून रखडले आहे. पुलाचे काम बंद असल्यामुळे स्थानिकांना व इतरांनाही वाहतुक कोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदार कंपनीच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे हे काम ठप्प झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे .सातारा तालुक्यातील नागठाणे ही सर्वात मोठी विकसित होणारे बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे बॉम्बे रेस्टॉरंट व शेंद्रे येथील उड्डाणपूला सारखा पुल होणे गरजेचे आहे. कराड, पाटण तालुक्यातील मोठी गावे नागठाणे गावाला जोडली गेलेली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील कच्चामालाची ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाड्यांच्या सहाय्याने येथून वाहतूक केली जाते परंतु पुलाचे काम अर्धवट राहिल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. नागठाणे ही उत्तम बाजारपेठ आहे. तसेच या ठिकाणी रोज हजारो लोकांची वर्दळ असते. विद्यार्थी अन्य गावातून नागठाणे येथे शिक्षणासाठी येतात परंतु केवळ पुलाचे काम न झाल्याने या सर्वांनाच कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
