महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा दणका; प्रेम पवार गँगवर ‘मोक्का’ची कारवाई

सातारा: सातारा शहर आणि लगतच्या परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी सातारा पोलीस दलाने अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या कुख्यात प्रेम पवार गँगच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) अत्यंत कठोर कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, कायदा हातात घेणाऱ्या समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत.

       पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यात सातत्याने डोके वर काढणाऱ्या सराईत गुन्हेगार व टोळ्यांची दहशत मोडीस काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार, सातारा शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यात निर्भय व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. मागील काही वर्षांपासून आपल्या टोळीची दहशत निर्माण करून नागरिकांना दमदाटी करणे, जबरदस्तीने पैसे उकळणे आणि संघटित गुन्हेगारी चालविणाऱ्या शाहुपुरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेम गणेश पवार (वय २२, रा. शुक्रवार पेठ, सातारा) आणि त्याच्या साथीदारांवर हा बडगा उगारण्यात आला आहे.

       या कुख्यात टोळीमध्ये मुख्य सूत्रधार प्रेम गणेश पवारसह टोळीचे सदस्य प्रेम आबासाहेब अडागळे (वय २१, रा. सिध्दीविनायक कॉलनी, शाहुपुरी), आनंद उर्फ आण्णा लक्ष्मण माने (वय २१, रा. दिव्यनगरी, शाहुपुरी) आणि एक विधिसंघर्ष ग्रस्त बालक यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरदस्तीने पैसे हिसकावून घेणे, गर्दीत मारामारी करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे तसेच शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन नागरिकांना त्रास देणे यांसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळक्याने संघटितपणे लोकांच्या मनात दहशत निर्माण केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी या सर्व आरोपीं विरुद्ध मोक्काअंतर्गत कायदेशीर प्रस्ताव तयार केला.

         हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर करण्यात आला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करून मोक्का कायद्यान्वये कलमे वाढवण्याची अधिकृत परवानगी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

         या कारवाईमुळे सातारा पोलिसांनी मग्ररी दाखवणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी व मालमत्तेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांच्या डोक्यात कायद्याची भीती उरलेली नसेल, तर ती पुन्हा निर्माण करण्यासाठी सातारा पोलीस अशाच प्रकारच्या कठोर कारवाया आगामी काळातही अविरत सुरू ठेवणार आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या पथकातील अंमलदारांनी संयुक्तरीत्या पार पाडली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!