साताऱ्यात प्रथमच सापडले पुरातनकालीन पटखेळांचे अवशेष
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली येथे असणाऱ्या भैरवनाथ मंदिरात पुरातन कालीन पटखेळांचे (बैठे खेळ) अवशेष सापडले आहेत. प्राचीन काळात पुरेशा सोई सुविधा उपलब्ध नसल्याने मनोरंजनासाठी विविध खेळ खेळले जात होते. यामध्ये अष्टपदा , चतुरंग, पचीसी असे अनेक बैठे खेळ भारतात खेळले जात होते. तसेच परकीयांच्या व्यापारी संपर्कामुळे तेथील काही खेळ आपल्या देशात आले. प्राचीन खेळ संवर्धन मोहिमेअंतर्गत सध्या राज्यात प्राचीन पटखेळांच्या अवशेषांचा शोध सुरू आहे. आत्ता पर्यंत महाराष्ट्रातील त्रिरश्मि लेणी,गोंदेश्वर मंदिर, अंकाई लेणी, ढग्या डोंगर आणि त्रिंगलवाडी लेणी यांसह विविध ठिकाणी मंदिरे, लेणी आणि डोंगरावर कोरलेले अनेक पटखेळ शोधले आहेत. लोणार सरोवराच्या आसपासच्या मंदिरात आणि महाराष्ट्रात 50 हून अधिक ठिकाणी हे खेळ सापडले आहेत.
असेच अवशेष सातारा जिल्ह्यातील चिखली येथे सापडले आहेत. एकूण सात पट खेळांचे अवशेष सापडले असून त्यात वाघ -बकरी,पंच खेलिया, अष्टचल्लस नवकंकेरी या प्राचीन बैठ्या खेळांचा समावेश आहे. नव्या पुरातत्वीय संशोधनामुळे कराडसह वाईचा भाग हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन व्यापारी मार्ग होता. नाशिकचे पुरातत्त्वज्ञ सोनवळ साळी आणि साताऱ्यातील अभ्यासक साक्षी महामुलकर यांचे संशोधन त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. या खेळांचे दस्तावेजीकरण व नोंद झाली असून सातारा जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
