महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यात रविवारी जीवन विद्या मिशनच्या रौप्य महोत्सवाचा कृतज्ञता आनंद सोहळा

    जीवन विद्या मिशन ही समाजाच्या उत्कर्ष व उन्नतीसाठी झटणारी संस्था आहे. हे जग सुखी व्हावे, हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे आणि  तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या सिद्धांताभोवती जीवन विद्येचे तत्त्वज्ञान फिरत आहे. सद्गुरू वामनराव पै हे १९५५ सालापासून या संस्थेच्या माध्यमातून जीवन विद्येचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. सद्गुरु वामनराव पै यांच्या पश्चात त्यांचे पुत्र आदरणीय प्रल्हाददादा पै हे भारत देशासह जगभरात कार्य पसरवत आहेत. 

       सातारा येथील हजेरीमाळ मैदानावर ८ डिसेंबर १९९९  रोजी सद्गुरु वामनराव पै यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य असा न भूतो न भविष्यती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता. या महोत्सवाला हजारो नामधारक उपस्थित होते. रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत रौप्य महोत्सवाची २५ वर्षे कृतज्ञतेची हा आनंद सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यामध्ये जीवन विद्या मिशनमध्ये गेली २५ वर्ष कार्य करणाऱ्या नामधारकांच्या मनोगतातून अनुभव अनुभवयास मिळणार आहेत. या रौप्य महोत्सवात हरिपाठ, नामसंकीर्तन यज्ञ व नामधारक मनोगत व्यक्त करणार आहेत. हरिपाठ नामसंकीर्तन संगीतमय वातावरणात होणार असून, या कार्यक्रमात मुंबई येथील कलाकारांची साथ लाभणार आहे.

       जीवन विद्या मिशनच्या सातारा, वाई व कोरेगाव शाखेच्या वतीने भव्यदिव्य असा रौप्यमहोत्सव जिल्हा परिषदेसमोरील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे जीवन विद्या मिशनचे विश्वस्त चंद्रशेखर चोरगे हे स्वागतोत्सुक असणार आहेत. या महोत्सवाला जिल्ह्यातून हजारो नामधारक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा शाखेच्या अध्यक्ष संगीता शिराळे, वाई शाखेच्या अध्यक्ष स्वाती मांढरे व कोरेगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. विधाते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!