महत्त्वाच्या बातम्या

सिंहगड किल्ल्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; वादग्रस्त फलक लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे:

पुण्याच्या ऐतिहासिक आणि गडप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या सिंहगड किल्ला परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका अज्ञात समाजकंटकाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हेतूने एक वादग्रस्त फलक लावला होता. या वादग्रस्त मजकुरामुळे गडप्रेमी आणि पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या फलकावर सिंहगड किल्ला हा केवळ हिंदूंचा असून येथे मुस्लिमांना प्रवेश बंदी असल्याचे लिहिण्यात आले होते. विशेष म्हणजे, हा फलक सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय नियम किंवा शासकीय आदेश वाटावा, अशा पद्धतीने हुबेहूब तयार करण्यात आला होता. त्यावर ‘आदेशावरून‘ असा स्पष्ट उल्लेख करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता.

हा वादग्रस्त फलक काही सजग नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने याची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली आणि तो वादग्रस्त फलक तिथून हटवला. प्रशासनाने किंवा शासनाने असा कोणताही अधिकृत अथवा बंदीचा आदेश जारी केलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा (NC) दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!