महत्त्वाच्या बातम्या

हॉस्टेलच्या मुलींची छेड काढतो असा आरोप करत महिलेने कान चावला: पडले पाच टाके

      जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना हॉस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरून हॉस्टेल चालक व त्याच्या सुनेने तरुणाला मारहाण केली. सुनेने कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले. याबाबत मिलिंद वसंत कोठारी (४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सुरेश विठ्ठल कांबळे (६०) व त्यांची सून यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात. सोमवारी दुपारी ते जेवण करून घराबाहेर उभे असणारे मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स हॉस्टेलचे  कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असे म्हणून फिर्यादी यांच्याशी भांडायला लागले. तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत, असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केली. त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!