२१ व्या राष्ट्रीय ललित कला महोत्सवाचा समारोप सोहळा उत्साहात
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनिस्को यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा राष्ट्रीय भारतीय ललितकलांचा दहा दिवसीय महोत्सव मोठ्या दिमाखात पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, शिवाजीनगर या ठिकाणी पार पडला. या महोत्सवात भारतातील १८ राज्यातून ४००० कलाकार सहभागी झाले होते. भारतीय शास्त्रीय नृत्य यात भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी, मणिपुरी, कथकली, ओडिसी तसेच हिंदुस्थानी कर्नाटकी गायन तसेच अनेक प्रकारचे वाद्य वादन असे एकूण एक हजार चारशे कलांचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, हेमंत वाघ, अभिनेत्री व नृत्य नृत्यदिग्दर्शका अनुपमा सत्यांजली, प्रसिद्ध गायिका बुलबुल बोस, संगीत अभ्यासक स्नेहा पेठकर, नृत्यांगना अनुपमा मोहन आदी मान्यवर उपस्थित होते. मिसाळ म्हणाल्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात असा राष्ट्रीय दर्जाचा महोत्सव गेल्या दोन दशकांपासून भरत आहे. याचे कौतुक वाटत आहे. कलेमध्ये कोणीही पहिला दुसरा असे नसते. कलाकाराने त्याची कला अविरतपणे सादर करत राहावी. देशाच्या कानाकोपऱ्यातून या महोत्सवात हजारो कलाकारांनी सहभाग घेतला होता. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये विविध प्रकार पुणेकरांना पाहायला मिळाले.
परिक्षक म्हणून जेष्ठ नृत्यांगना, अनुपमा मोहन (केरळ) बुलबुल बोस (पश्चिम बंगाल), संगीता चाकी (सिलिगुडी) स्नेहा पेटकर (महाराष्ट्र), तमन्ना नायर (महाराष्ट्र मुंबई), विजया काळे (महाराष्ट्र पुणे), मृदुला आडवतकर (महाराष्ट्र पुणे) यांनी काम पाहिले. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले.
थायलंड आणि पटायामध्ये जाण्याची कलाकारांना मिळणार संधी – हेमंत वाघ
या महोत्सवात सहभाग घेतलेल्या स्पर्धकांच्या कला गुणांचे निरीक्षण व सांस्कृतिक नृत्य, संगीत, सुर, ताल, राग, भाव अशा विविध प्रकारच्या अंगीकृत भूमिका असलेल्या कलाकारांना विजेता म्हणून घोषित करण्यात आले. सदरील कलाकारांना थायलंड आणि पटाया या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. असे हेमंत वाघ म्हणाले.
