16 वर्षाच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न; मुलीचा वडिलांवर आरोप
पुण्यात एका 16 वर्षाच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न तिच्या सावत्र वडिलांनी केला आहे. वडिलांवर आरोप करून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू मुलीच्या आई आणि वडिलांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. पवन कुमार उर्फ राजू मंडल जनताप्रसाद कनोजिया (वय ३९)यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रार दिलेल्या मुलीच्या जैविक वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने दुसरे लग्न केले. मुलगी लहानपणापासूनच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे तिच्या मावशीकडे राहत होती व तिचे आई-वडील पुण्यातील धनकवडी परिसरात गेल्या 14 ते 15 वर्षांपासून राहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मावशीकडे मुलीचा नीट सांभाळ केला जात नसल्याने तिच्या आई वडिलांनी तिला पुण्याला आणले. तक्रारीनुसार मुलीला नातेवाईकांच्या लग्नाचे खोटे कारण देऊन पुण्याला आणले गेले. त्यानंतर तिला कोंडून ठेवले व तिला विकण्याबद्दल कोणाशी तरी फोन वर बोलताना ऐकले आहे असा आरोप तिने वडिलांवर केला आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही मुलगी तिच्या आई वडिलांकडे राहत आहे. मुलीला मुर्शीदाबादला जायचे असल्याने तिने मुंबईच्या एनजीओशी संपर्क साधला त्यांनी त्यांच्या पुणे शाखेला कळवले. त्यानंतर पुण्यातील एनजीओने पोलिसांना कळवून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
मुलीने दिलेल्या जबाबा नुसार समितीने पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास सांगितले. त्यानंतर मुलीला बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे.मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढीलप्रमाणे तपास सुरु आहे.
