लोहगाव

लोहगावात विनापरवाना रस्ते खोदकाम; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

गृह विभागाच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी केबल टाकण्याचे काम; परवानगी नसल्याने काम बंद करण्याच्या सूचना

संदेश येवले प्रतिनिधी |: लोहगाव येथील वडगाव शिंदे रस्त्यावर गृह विभागाच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी केबल टाकण्याकरिता रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू करण्यात आले होते. मात्र, या कामासाठी पुणे महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे समोर आल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या पथ विभागाने संबंधित कंत्राटदाराला काम तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी वडगाव शिंदे रस्त्यावर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराकडे विचारणा केली असता, गृह विभागाच्या प्रकल्पासाठी खोदकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कामासाठी महापालिकेची अधिकृत परवानगी नसल्याचा दावा नागरिकांनी केला. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही विभागाच्या कामासाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक नसते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वडगाव शिंदे रस्ता हा लोहगावमधील वर्दळीचा मार्ग असून, या रस्त्यावरून शाळेच्या बस, लहान मुले, दुचाकीस्वार आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असताना, परवानगीशिवाय होणाऱ्या खोदकामामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची योग्य डागडुजी केली जात नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत.

या प्रकरणी स्थानिक नागरिक संदीप दौंडकर यांनी, कोणत्याही विकासकामाला नागरिकांचा विरोध नसून, सार्वजनिक रस्त्यांवर काम करताना नियमांचे पालन करणे आणि काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची पूर्ववत दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, या खोदकामाबाबत महापालिकेच्या पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय वाडेकर यांनी संबंधित कंत्राटदाराने आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. त्यामुळे काम तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता महापालिका या प्रकरणी पुढे काय कारवाई करते आणि खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती कधी होते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!