महाराष्ट्र

मोबाईलसाठी पैशांचा वाद ठरला जीवघेणा! २९ वर्षीय मुलाकडून वडिलांची हत्या; धाराशिव जिल्ह्यातील घटना

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने संताप; अंगणात झोपलेल्या पित्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार

धाराशिव : मोबाईल फोन आणि त्यासाठी पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील येवती गावात घडली आहे. स्वतःच्या मुलानेच वडिलांवर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत खंडू पांडुरंग डोंबाळे (वय ५६) यांचा मृत्यू झाला असून, श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय २९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. ही घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री श्रीशैल याने वडील खंडू डोंबाळे यांच्याकडे मोबाईल देण्याची तसेच नवीन मोबाईल खरेदीसाठी पैसे देण्याची मागणी केली होती. मात्र, रात्रीची वेळ झाल्याने वडिलांनी मोबाईल देण्यास आणि पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यानंतर खंडू डोंबाळे घरासमोरील अंगणात झोपले होते. काही वेळाने मुलगा पुन्हा घरी आला. त्याने चुलीजवळ ठेवलेली लोखंडी फुकारी उचलून झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खंडू डोंबाळे यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताची पत्नी सुरेखा खंडू डोंबाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी श्रीशैल ऊर्फ बबलू याच्याविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे करीत आहेत. मोबाईलसारख्या वस्तूवरून जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे येवती गावात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!