सातारा

वडिलांचे स्वप्न लेकीने केले साकार! आनेवाडीच्या सोनिया फरांदे यांची सहायक नगर रचनाकारपदी निवड

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

महाराष्ट्र शासनाकडून नियुक्तीचे आदेश जारी; जावळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

आनेवाडी (ता. जावळी) : जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर ग्रामीण भागातील कन्येने प्रशासकीय सेवेत यश संपादन करत आपल्या कुटुंबासह गावाचा नावलौकिक वाढवला आहे. आनेवाडी येथील सोनिया संजय फरांदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या निवड प्रक्रियेतून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत सहायक नगर रचनाकार, श्रेणी-१ (गट-ब, राजपत्रित) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत आदेश ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहेत. या यशामुळे आनेवाडी गावासह संपूर्ण जावळी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ अंतर्गत राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत सोनिया फरांदे यांची शिफारस करण्यात आली होती. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. महाराष्ट्र नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोनिया यांच्या या यशामागे एक भावनिक पार्श्वभूमीही आहे. त्यांचे वडील स्वतः सहायक नगर रचनाकार अधिकारी म्हणून कार्यरत होते. मुलीनेही मोठे अधिकारी व्हावे आणि स्वतःच्या कर्तृत्वातून समाजात स्वतंत्र ओळख निर्माण करावी, हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते. वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोनिया यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. आज शासनाच्या त्याच विभागातील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने फरांदे कुटुंबासाठी हा क्षण विशेष अभिमानाचा ठरला आहे.

विशेष म्हणजे, सोनिया फरांदे या आनेवाडीचे माजी मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षणप्रेमी कै. तानाजी फरांदे गुरुजी यांच्या नात आहेत. आजोबांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य आणि कुटुंबातील शैक्षणिक परंपरा यांची प्रेरणा सोनिया यांना लाभली. तीन पिढ्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या या यशामुळे नवा सन्मान मिळाला आहे.

ग्रामीण भागातील मुलीही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर प्रशासकीय सेवेत उच्च पदे मिळवू शकतात, हे सोनिया यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल आनेवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थिनी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणींना नवी प्रेरणा मिळाली आहे.

चौकट : वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकले, याचा अभिमान!

“माझे वडीलदेखील सहायक नगर रचनाकार अधिकारी होते. मी मोठी अधिकारी व्हावे आणि स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करावी, असे त्यांचे स्वप्न होते. आज महाराष्ट्र शासनाच्या सहायक नगर रचनाकारपदी माझी निवड झाल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. या यशामागे माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबीयांचे सहकार्य आणि माझे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. माझे आजोबा कै. तानाजी फरांदे गुरुजी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्यही माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. माझ्या यशामुळे माझ्या कुटुंबाला आणि गावाला आनंद झाला, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”

error: Content is protected !!