महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग: ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात?

    शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या सोहळ्यात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान केला. या घटनेमुळे ठाकरे गट नाराज झाला आहे.त्याचवेळी, दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांकडून “ऑपरेशन टायगर” चा उल्लेख होत असून, काही ठाकरे गटाचे खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

 स्नेहभोजनावरून चर्चा तापली

शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी महाराष्ट्रातील सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार येणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे खासदार त्या कार्यक्रमाला हजर होते.

 शिंदे गटाशी वाढती जवळीक?

इतकेच नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी देखील एक स्नेहभोजन ठेवले होते. ठाकरे गटातील खासदार तिथे जाणार नाहीत, अशी शक्यता होती. मात्र, संजय दिना पाटील या कार्यक्रमाला हजर होते. तसेच, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यातही हजेरी लावली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

 ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाणार?

या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात प्रवेश करू शकतात का, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष तीव्र असतानाही ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!